पुणे - पुणे शहरात रोपवे सुरू करण्याची संकल्पना ही पर्यटनाच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह आहे. पुण्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारा हा एक चांगला प्रकल्प ठरू शकतो. पुण्यात रोपवे सुरू करण्याची संकल्पना सर्वप्रथम दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मांडली होती. त्यामुळे पुण्यात रोपवे व्हावा ही भूमिका सकारात्मक आहे. मात्र सारसबाग ते पर्वती असा रोपवे करण्याचा प्रस्ताव व्यवहार्य वाटत नाही. या प्रस्तावाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे, अशी भूमिका युवासेनेने मांडली आहे.
सारसबाग आणि पर्वती हा परिसर पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, पर्यटक आणि भाविकांची ये जा असते. त्यातच या परिसरात सध्या पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रोपवे प्रकल्प झाल्यास वाहनांची संख्या आणि पर्यटकांची गर्दी आणखी वाढून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः स्वारगेट हे पुण्याचे महत्त्वाचे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आहे. मेट्रो, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे या परिसरात आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी रोपवे प्रकल्पामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तसेच बाजीराव रस्त्यावरील वाहतूक आणि पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने या परिसरातील रस्ते मोकळे राहणे अत्यंत गरजेचे आहे.
याशिवाय रोपवे उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी, उपलब्ध जागा, प्रवाशांची सुरक्षितता, पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरणीय परिणाम यांचाही सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करता सारसबाग ते पर्वती या मार्गाऐवजी तळजाई टेकडी ते पर्वती असा रोपवे उभारण्याचा पर्याय अधिक योग्य ठरू शकतो. तळजाई टेकडी परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा आणि रोपवेच्या उभारणीसाठी जागेच्या उपलब्धतेचा विचार करता या पर्यायाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करावा. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवरील अतिरिक्त ताण टाळता येईल, पार्किंगचा प्रश्न कमी होईल आणि पर्यटकांनाही रोपवेचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर पुण्याच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळू शकेल.
या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सारसबाग ते पर्वती या प्रस्तावाचा पुनर्विचार करून तळजाई टेकडी ते पर्वती या पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना करण्यात येत आहे.
शेवटी शिवसेनेची भूमिका नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे. चांगल्या आणि शहराच्या हिताच्या प्रकल्पांना विरोध करणे ही शिवसेनेची भूमिका कधीच नव्हती. मात्र विकास करताना नागरिकांच्या सोयी, शहराची वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. रोपवे प्रकल्प व्हावा पण तो पुणेकरांच्या हिताचा आणि शहराच्या नियोजनाला पूरक असावा हीच आमची भूमिका आहे, असे पुणे महानगर अध्यक्ष युवासेना हेमंत आबा बागुल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.