PUNE : डीजे मुक्त गणेशोत्सवाचे कौतुक ते अजित दादांच्या आठवणीपर्यंत, रुपाली चाकणकर यांनी गणेशोत्सवात मांडली मनातील व्यथा - टॉप न्यूज मराठी

पुणे : गणेशोत्सवानिमित्त बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पुणेकरांना आणि राज्यभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

पुण्यातील गणेशोत्सवात यंदा पुनीत बालन यांनी राबवलेल्या डीजे मुक्त गणेशोत्सव संकल्पनेचे चाकणकर यांनी विशेष कौतुक केले. डीजे मुक्त उत्सवामुळे ध्वनी प्रदूषण टळते आणि पारंपरिक वाद्यांना महत्त्व मिळते. तसेच त्यांनी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो सामाजिक संदेश देण्याचे माध्यम आहे असे त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला. गर्भात वाढणाऱ्या मुलीचे स्वागत झाले पाहिजे आणि बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच सध्या महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे, त्या बळीराजासाठी त्यांनी गणरायाकडे प्रार्थना केली.

यावेळी बोलताना त्यांना अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या स्थापनेपासून आपण दादांसोबत काम केले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली याची आठवण त्यांनी सांगितली.

आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना चाकणकर यांनी ते सर्व आरोप खोटे असल्याचे ठामपणे सांगितले. आपण दिल्ली, मुंबई, माजगाव, पुणे अशा अनेक ठिकाणी कायदेशीर लढा देत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आपण आपली बाजू सिद्ध केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या चारित्र्यावर होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा दाखला दिला. दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुलेंनाही चारित्र्यावर शिंतोडे सहन करावे लागले होते. आज त्याच सावित्रीची लेक म्हणून आपण हा लढा देत आहोत असे त्या म्हणाल्या. त्या महाराष्ट्राच्या लेक आहेत आणि खोट्या आरोपांना बळी पडणार नाहीत असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आपल्या राजकीय कमबॅक बद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की कमबॅकचा प्रश्नच येत नाही कारण आपण कधीच राजकारणातून दूर गेलो नाही. आपण सतत लोकांमध्ये आणि कामात आहोत. महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे मग ती महिला कोणत्याही पक्षाची असो किंवा कोणतीही व्यक्ती असो. महिला सन्मानासाठी आपण सुरुवातीपासून लढत आलो आहोत आणि पुढेही लढत राहू असे त्यांनी सांगितले.