पुणे : शहरातील ऑटोरिक्षा चालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. परवाना बंदीमुळे प्रलंबित असलेल्या इरादापत्रांना आणि वाहन बदलाच्या परवान्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मुदतवाढ दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इरादापत्रांची 180 दिवसांची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर संपली आहे, आणि ज्या अर्जदारांनी 30 सप्टेंबर 2026 पूर्वी मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे, अशा सर्व इरादापत्रांना एक वेळ 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अनेक ऑटो चालकांना नवीन वाहन नोंदणीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. त्याचबरोबर 9 मार्च 2026 पर्यंत नवीन ऑटोरिक्षा नोंदणीसाठी अर्ज केलेल्या, परंतु ज्यांना अद्याप नोंदणी क्रमांक मिळालेला नाही, अशा इरादापत्रांनाही 180 दिवसांची मुदतवाढ देऊन वाहन नोंदणीसाठी सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
जुन्या ऑटोरिक्षाच्या जागी नवीन ऑटोरिक्षा घेण्यासाठी असलेल्या रिप्लेसमेंटच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. 30 जून 2026 पर्यंत रिप्लेसमेंटची मुदत संपलेल्या प्रकरणांमध्ये दंड भरून 31 डिसेंबर 2026 पर्यंत नवीन वाहन सादर करून नोंदणी पूर्ण करता येणार आहे. तसेच 1 जुलै 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात रिप्लेसमेंटची मुदत संपलेल्या प्रकरणांमध्ये कोणताही दंड न आकारता 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाहन बदलाची नोंदणी करता येणार आहे. मात्र या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास परवाना रद्द केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय 1 सप्टेंबर 2026 नंतर रिप्लेसमेंट झालेल्या प्रकरणांसाठी रिप्लेसमेंटची मुदत सहा महिन्यांची असेल आणि मुदत संपल्यानंतर केवळ एकदाच सहा महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.