PUNE : पुण्यातील गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज, वाहतूक आणि सुरक्षेचा आढावा घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे महत्त्वाचे निर्देश - टॉप न्यूज मराठी

Pune : पुणे शहरातील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. गणेशोत्सव काळात पुण्यात देशभरातून लाखो भाविक येत असल्याने वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल उपस्थित होते. उपमुख्यमंत्री म्हणाल्या की, रेल्वे आणि बसने येणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, त्यामुळे गर्दीच्या वेळेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ लावावे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी वाहतूक आणि गर्दीचे स्वतंत्र नियोजन करावे, पर्यायी मार्ग, पार्किंग आणि गर्दीची माहिती नागरिकांना वेळेत द्यावी.

महिला आणि बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारी आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी 24 तास पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागात वीजपुरवठा अखंडित ठेवावा आणि विसर्जनाच्या दिवशी विसर्जन कुंडांवर प्रकाश, सुरक्षा आणि सतत स्वच्छतेची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्तांनी रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती, शौचालये, सीसीटीव्ही आणि वैद्यकीय पथके सज्ज असल्याची माहिती दिली, तर मेट्रो प्रशासनाने मंडई स्थानक फक्त बाहेर पडण्यासाठी वापरण्याचे आणि दर्शनासाठी कसबा पेठ किंवा स्वारगेट स्थानक वापरण्याचे आवाहन केले.