पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या बदलत्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127 व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, दीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. या टप्प्यावर ज्ञानाचे रूपांतर जबाबदारीत आणि शिक्षणाचे नेतृत्वात होते. आजच्या बदलत्या परिस्थितीत केवळ पदवी पुरेशी नाही, तर विद्यार्थ्यांनी आजीवन ज्ञानार्जन करत नवनवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा सावित्रीबाई फुले यांचा विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रयत्न करत असून त्याचे राज्यपालांनी कौतुक केले. बहुविषयक शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन, नवोन्मेष, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याला प्राधान्य द्यावे. परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा. डिजिटल प्रशासन आणि हरित उपक्रमांमुळे विद्यापीठ अधिक पारदर्शक आणि शाश्वत होईल, असेही त्यांनी सांगितले.
दुबई, सौदी अरेबिया आणि कझाकिस्तान मधील शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यापीठाचा जागतिक विस्तार अधिक बळकट होऊ शकतो. आंतरराष्ट्रीयीकरणा मध्ये विद्यार्थी देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि जागतिक भागीदारीला महत्व द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उद्योग क्षेत्रासोबत भागीदारी वाढवून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी द्याव्यात. माजी विद्यार्थ्यांचे जाळे सक्षम करून त्याचा उपयोग मार्गदर्शन आणि रोजगारासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्य, कृषी, सायबर सुरक्षा आणि ग्रामीण परिवर्तन या क्षेत्रातील संशोधनाला चालना द्यावी. प्रत्येक विद्यापीठाने वार्षिक क्रीडा दिनदर्शिका तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यापीठ परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी जनजागृती आणि समुपदेशन करावे, असेही राज्यपाल म्हणाले.
यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. विद्यापीठाशी संलग्न 859 महाविद्यालयांमध्ये साडे सात लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून ज्ञाननिर्मिती ही फक्त प्रयोगशाळेपुरती न ठेवता समाज, गाव आणि शेतापर्यंत पोहोचवण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.