PUNE : दहीहंडीत लावणी पडली महागात, प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ? - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात दहीहंडी उत्सवात परवानगी नसताना लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील आणि मंडळाच्या दोन आयोजकांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर न करता कार्यक्रम घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्पायर ग्रुप ए के बॉईज मंडळाचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांनी दहीहंडी निमित्त राधा पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी लावणी, तमाशा, लोकनाट्य सादर करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र आणि कार्यक्रमाची संहिता सादर करणे बंधनकारक आहे. आयोजक आणि राधा पाटील यांनी कोणतेही प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारूनही कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिस हवालदार नंदलाल भादले यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. 

कोण आहे राधा पाटील ?

राधा पाटील या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा आहेत. त्या मूळच्या मुंबईच्या असून अनेक दहीहंडी, गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या लावणीचे कार्यक्रम होतात. सोशल मीडियावरही त्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याप्रमाणेच गौतमी पाटील, माधुरी पवार, वैष्णवी पाटील या नृत्यांगना देखील सध्या महाराष्ट्रात दहीहंडी आणि यात्रा उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतात. या कार्यक्रमांना तरुणांची मोठी गर्दी होते आणि लाखो रुपयांचा खर्च केला जातो.

सार्वजनिक कार्यक्रमात लावणी सादर करण्यासाठी नियम काय ? 

  • रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे कार्यक्रमाची संहिता, गाण्यांची यादी आणि सादरीकरणाचा सारांश आधी सादर करून योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. 
  • पारंपरिक वाद्यांचा वापर अपेक्षित आहे आणि डीजेवर अश्लील गाण्यांवर नृत्य करण्यास बंदी आहे. 
  • अशा नृत्यांगनांना बोलावण्यासाठी मंडळांना अंदाजे 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत मानधन द्यावे लागते. 
  • यात साऊंड सिस्टिम आणि इतर खर्च वेगळा असतो. 

मुंबई, ठाणे आणि पुण्यात दहीहंडीत अश्लील डीजे लावणी सादर होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून या अश्लील कार्यक्रमांवर बंदी आणावी आणि उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतरच सांस्कृतिक विभागाने पोलिसांना प्रमाणपत्र तपासणी बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत.