पुणे : ‘शैक्षणिक क्षेत्राने उद्योगविश्वाचा सन्मान करावा आणि उद्योगविश्वाने शैक्षणिक क्षेत्राचा गौरव करावा’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स २०२६’च्या चौथ्या पर्वाचा शिक्षक दिनानिमित्त, ५ सप्टेंबर रोजी पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे दिमाखदार समारोप झाला.
पुण्यातील मनुष्यबळ व प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रातील जॉबिझ्झा या संस्थेने, संस्थापक डॉ. गौरव शर्मा यांच्या पुढाकारातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यास शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि विविध क्षेत्रांतील ६०० हून अधिक मान्यवरांची उपस्थिती होती. शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रत्येकी १५ अशा एकूण ३० मान्यवर नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वगुणांसाठी, नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी आणि भविष्यासाठी सक्षम मनुष्यबळ घडविण्यातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला pass 98 या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मुलाखत-तयारी मंचाचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले, तर यवतमाळ येथील जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनेही प्रायोजक म्हणून सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारे असण्याची गरज अधोरेखित केली. तसेच महिला सक्षमीकरण आणि उद्योग-शिक्षण क्षेत्रातील समन्वयावर त्यांनी विशेष भर दिला.
ते म्हणाले, “महिलांना शिक्षण घेण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांची क्षमता केवळ घरापुरती मर्यादित राहता कामा नये. महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन आणि लवचिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. शिक्षण परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भरती करणारे उद्योगविश्व यांचा समन्वय झाला, तरच भारताच्या भविष्यातील क्षमता पूर्णपणे साकार होतील.”
यानंतर झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादात शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांच्या अपेक्षा यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “उद्योगक्षेत्राच्या सक्रीय सहभागाशिवाय अर्थपूर्ण प्रतिभाविकास आणि आवश्यक संसाधनांचा योग्य वापर शक्य नाही. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष जगातील कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्योगविश्वाने पुढाकार घेत शैक्षणिक संस्थांसोबत सक्रियपणे काम केले पाहिजे.”
सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई यांनी शिक्षणव्यवस्थेतील शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले, “भारतीय उद्योगविश्वाने शिक्षण क्षेत्रासाठी केलेली सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे आपल्या अध्यापन व्यवस्थेला बळकटी देणे. देशात सक्षम आणि आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज शिक्षकांची मोठी गरज आहे. शिक्षकांना सक्षम करून त्यांच्यात गुंतवणूक केली, तर आपण भारताचे भविष्य आणि देशाची वाटचाल सुरक्षित करीत आहोत.”
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पीसीएमसी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोनवणे म्हणाले, “विद्यार्थी आणि रोजगार देणाऱ्या संस्था या दोघांसाठीही परस्पर फायदेशीर व्यवस्था निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगविश्वाने एकत्रितपणे पुढे जाणे आवश्यक आहे. आमच्या विद्यापीठाने अभ्यासक्रमाची आखणी आणि अध्यापन प्रक्रियेत उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचा थेट सहभाग ३० टक्क्यांपर्यंत नेला आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी पदवी प्राप्त करतानाच उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्यांनी सज्ज होतात.”
या नेतृत्वपर परिसंवादात जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. आहुजा, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, एनस्क्वेअर एक्सपर्ट्सचे मुख्य धोरण अधिकारी किरीट मांडवगणे आणि टाटा मोटर्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय वाधवा यांनीही महत्त्वपूर्ण विचार मांडले.
पारंपरिक पद्धतीने केवळ पदव्या देण्यापेक्षा उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उद्योगाभिमुख कौशल्यविकासाची साखळी निर्माण करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या सोहळ्यात कुलगुरू, अधिष्ठाता, संचालक आणि प्राचार्य यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक, मनुष्यबळ विभागप्रमुख आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी, अशा शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील एकूण ३० मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांमधील कौशल्याची दरी भरून काढण्यासाठी तसेच संस्थात्मक पातळीवर नावीन्यपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी योगदान देणाऱ्या या नेतृत्वाचा पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात आला.
‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स’च्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना जॉबिझ्झाचे संस्थापक आणि या पुरस्कारांचे संस्थापक डॉ. गौरव शर्मा म्हणाले, “उद्योगविश्व अनेकदा रोजगारासाठी तयार उमेदवार मिळत नसल्याची तक्रार करते, तर शैक्षणिक संस्था योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचे सांगतात. ही दरी दूर करून परस्पर संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’च्या संकल्पनेशी सुसंगत वाटचाल करताना विकसित महाराष्ट्र हा भारताच्या विकासाचा प्रमुख इंजिन ठरेल. ५ सप्टेंबरला शिक्षक आणि उद्योगक्षेत्रातील मार्गदर्शकांचा गौरव करणे म्हणजे जागतिक दर्जाची, शाश्वत आणि सक्षम प्रतिभाव्यवस्था उभारण्याच्या आमच्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे.”