PUNE : मॅग्नमच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; एक हजारांहून अधिक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान व लॉजिस्टिक्सचा वापर - टॉप न्यूज मराठी

पुणे : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख केंद्र म्हणून पुणे वेगाने विकसित होत असून, पुण्यात आतापर्यंत १३० पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या ८०० पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवावे, हे राज्य शासनाचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह उद्योजक आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्याला मिळणारा प्रतिसाद हा शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळाची पावती आहे. मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. त्यासोबतच अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. कंपनीच्या जागतिक व्यवसाय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी संबंधित प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम केल्यास गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम परिसंस्था निर्माण होते. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

श्री.फडणवीस म्हणाले, मुंबईतील प्रादेशिक मुख्यालयासोबत पुण्यात सुरू झालेले हे ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर मॅग्नमच्या महाराष्ट्रातील विस्ताराला नवी दिशा देणारे ठरेल. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी आणखी आकर्षक केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंजवडीसह पुण्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचे विशेष लक्ष आहे. उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही त्याचीच परिणती आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डॉ. पी. अनबलगन म्हणाले, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स ही केवळ कार्यालये नसून देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारी महत्त्वाची इंजिने आहेत. भारताने जगातील आघाडीचे जीसीसी केंद्र म्हणून आपले स्थान निर्माण केले असून, महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पुण्यात गेल्या १५ महिन्यांत जीसीसीसाठी सुमारे ६० लाख चौरस फूट जागेची मागणी झाली आहे. गेल्या १८ महिन्यांत राज्यात १३० नवीन अथवा विस्तारित जीसीसी युनिट्स सुरू झाली आहेत.

आगामी काळात राज्यात ४०० जीसीसी कंपन्या आणि ७०० हून अधिक युनिट्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे. पुण्यात सध्या ३० पेक्षा अधिक देशांतील कंपन्या २० विविध क्षेत्रांत कार्यरत असून, या क्षेत्रात सुमारे १० हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. जीसीसी कंपन्यांनी शासनाच्या विविध प्रोत्साहन योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.धवसे यांनी मॅग्नम आईस्क्रीम कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील संबंध विश्वास, विश्वासार्हता आणि परस्पर सन्मानाच्या पायावर उभे असल्याचे सांगितले. कंपनीचे जागतिक नेतृत्व करणारे भारतीय वंशाचे अधिकारी आणि फिलिप्स तसेच एएसएमएलमधील त्यांचा अनुभव प्रेरणादायी आहे. पुण्यातील हे केंद्र या दीर्घकालीन भागीदारीतील महत्त्वाचा टप्पा असून, मॅग्नमच्या भारतीय नेतृत्वासोबत शासन यापुढेही सहकार्य करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र शासनाच्या गतिमान निर्णयप्रक्रियेमुळे मॅग्नमचे जागतिक व्यवसाय केंद्र अल्पावधीत साकारल्याचे सांगितले. महाराष्ट्राची सक्षम औद्योगिक परिसंस्था, उत्तम संपर्कव्यवस्था आणि प्रशासनाची तत्परता यामुळे पुण्याची निवड करण्यात आल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. महाराष्ट्राला जागतिक व्यवसाय केंद्रांचे प्रमुख ठिकाण बनविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले. तसेच, ‘बेन अँड जेरी’ज हा जागतिक आईस्क्रीम ब्रँड भारतात आणण्यासोबतच शाश्वत दुग्धव्यवस्थेसाठी महाराष्ट्रासोबत सहकार्य करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.