पुणे : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून मध्यरात्री अटक केली. अटकेची ही कारवाई रात्री साडेबारा वाजता करण्यात आली असून, यावेळी मोठा तणाव पाहायला मिळाला. पोलिस साध्या वेशात घरी आले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पंडित यांनी आपला मोबाईल, गाडीची चावी आणि बेल्ट कुटुंबीयांकडे दिला. "पोलीस रात्री साडेबाराला घरात घुसतात, हीच आमच्यासारख्यांची लायकी आहे" असे म्हणत त्यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्यांच्या कुटुंबीयांनी शूट केला असून तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संतोष पंडित यांच्यावर युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील भाषेत टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांनीही त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. लोकप्रतिनिधी काम करत नाहीत, सामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देतात, अशा प्रकारची टीका करताना त्यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच दोन तक्रारींच्या आधारे कोथरूड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.
संतोष पंडित हे पुण्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पुणे महापालिकेच्या रस्ते, पाणी, कचरा आणि इतर विकासकामांमधील त्रुटींवर ते सातत्याने व्हिडिओ बनवून प्रशासनाला धारेवर धरत असतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यांच्या रोखठोक आणि आक्रमक शैलीमुळे ते पुणेकरांमध्ये प्रसिद्ध आहेत, तर अनेकदा त्यांच्या भाषेमुळे ते वादातही सापडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पंडित यांनी सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांनी व्हिडिओ पोस्ट करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे कायदेशीर कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशानंतर ठरवली जाईल.