PUNE : खासगी विद्यापीठांतही मराठी विभाग स्थापन होणार ! सरकारी विद्यापीठांमध्ये दरवर्षी विद्यार्थी संमेलन; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील - टॉप न्यूज मराठी

पुणे :  मराठी भाषेचा प्रसार-प्रचार होण्यासोबतच ती राज्यात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक खासगी, अभिमत विद्यापीठात आणि खासगी महाविद्यालयांत मराठी विभाग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी  या कालावधीत होणाऱ्या १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन प्रत्येक मराठी व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सरकारी तसेच खासगी विद्यापीठांच्या कुलगुरू, कुलसचिवांची बैठक पुणे विद्यापीठात पार पडली. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मराठी भाषा विभागाचें सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.अविनाश आवलगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महाळंक, सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, प्रदीप निफाडकर आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, परराज्यातून महाराष्ट्रात येऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आली पाहिजेच. त्याचप्रमाणे त्यांना भाषेचे ज्ञान मिळायला हवे. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात मराठी विभाग कार्यान्वित होण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान मिळण्यासोबत, त्यांच्यातील कलागुण विकसित होण्यासाठी आणि राज्यातील बोलीभाषा टिकण्यासाठी दरवर्षी विद्यापीठस्तरावर राज्यस्तरीय विद्यार्थी संमेलन घेण्यात येणार आहे, अशी घोषणा पाटील यांनी केली.

मंत्री सामंत म्हणाले, १०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य महामंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मराठी भाषा विभागाकडून वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल. राज्यातील विविध शहरांमधील ज्येष्ठ साहित्यिक, विद्यार्थी, नागरिक यांना संमेलनस्थळी आणण्यासाठी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून, परिवहन विभागाची मदत घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. कुलकर्णी यांनी मराठी ही ज्ञानभाषा आणि रोजगाराची भाषा होण्याच्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. गोसावी यांनी संमलेनाच्या आयोजनासाठी विद्यापीठातील उपलब्ध पायाभूत सुविधा; तसेच विकास कामांबाबतची माहिती दिली. डॉ. देवळाणकर यांनी संमेलनाच्या आयोजनामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग सहभागी झाला आहे. या माध्यमातून पारंपरिक अभ्यासक्रमांची सुमारे दोन लाख विद्यार्थी संमेलनाशी जोडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे सांगत डॉ. देवळाणकर यांनी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सक्रीय सहभाग नोंदवत, मराठीचा प्रसार -प्रचार करण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या. डॉ. पवार यांनी आभार मानले.