पुणे : खडकी येथील जी. एम. आय. कन्याशाळेतील नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी नुकतेच मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ट्री आय फाउंडेशनच्या ध्रुव प्रकल्पांतर्गत १०१ विद्यार्थिनींना याचा लाभ मिळाला.
ट्री आय फाउंडेशनतर्फे सातत्याने खडकी शिक्षण संस्थेतील विविध शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध योजना राबवल्या जातात. रक्त तपासणी शिबिरात निदान झालेल्या हिमोग्लोबिन कमी असलेल्या विद्यार्थिनींना आठवड्यातून चार वेळा फाउंडेशनतर्फे मोहाचे पौष्टिक लाडू पुरवण्यात येणार आहेत. पुन्हा चार महिन्यानंतर रक्त तपासणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाणार आहे. संस्थेतील पर्यवेक्षिका अनिता झांबरे यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराला खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह सर्व शाखांचे प्राचार्य, पर्यवेक्षक यांनी भेट दिली. याप्रसंगी अंजुम इनामदार यांनी ट्री आय फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. फाउंडेशनच्या प्रिया जोशी आणि सोनाली पवार यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.