पुणे : विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरलेले मैदान... नव्या-कोऱ्या बास्केटबॉल संचाची उत्सुकता आणि इतक्यात थेट जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनीच केलेला गोल... खडकी शिक्षण संस्थेच्या परिसराने गुरुवारी असा उत्साहाचा प्रसंग अनुभवला. संस्थेच्या भव्य मैदानात नव्याने बसविण्यात आलेल्या विविध क्रीडा साहित्याचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी व माजी सैनिक जगन्नाथ टेकाळे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर टेकाळे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि सचिव आनंद छाजेड यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून बास्केटबॉलचा आनंद लुटला. त्यांचा खेळ पाहून उपस्थित विद्यार्थ्यांमध्येही नवचैतन्य संचारले.
या प्रसंगी संस्थेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विविध शाखांचे प्राचार्य, पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ टेकाळे म्हणाले, ‘आजच्या मोबाइलच्या युगात मुलांना मैदानाकडे वळविण्याचे मोठे आव्हान सर्व पालक आणि शिक्षकांपुढे आहे. मात्र, शाळेत योग्य क्रीडा साहित्य आणि दर्जेदार मैदान उपलब्ध असेल, तर मुलांची पावले आपोआप मैदानाकडे आणि पर्यायाने शारीरिक शिक्षणाकडे वळतील. खेळामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो.’
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नाही तर सर्वांगीण दृष्टीने तयार करणे हे आमच्या संस्थेचे ध्येय आहे. आमच्या शाळेतून आजवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू घडले आहेत. हाच वारसा आम्हाला सतत पुढे न्यायचा आहे. त्यासाठीच आम्ही विद्यार्थ्यांना खेळासाठी सतत प्रोत्साहन देत आहोत आणि नवीन सुविधा उपलब्ध करून देत आहोत.’
खडकी शिक्षण संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती वाढण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.