पुणे : केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने केलेल्या रस्ते दुरुस्ती आणि सुशोभीकरणावरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. शहरातील रस्त्यांची रातोरात डागडुजी करणे म्हणजे "भ्रष्टाचार झाकण्यासाठी मारलेला डांबराचा पोतडा" असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे गटनेते अॅड. रामचंद्र आत्माराम कदम यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे महानगरपालिकेचा कारभार म्हणजे केवळ 'इव्हेंट' झाला आहे. रातोरात खड्डे बुजवले जात आहेत, भर पावसात भिंतींना रंग दिला जात आहे आणि रस्त्यांवर डांबराचे थर टाकले जात आहेत.सामान्य पुणेकरांनी तक्रारी केल्या किंवा आंदोलने केली की "निधी नाही" असे सांगितले जाते. मात्र भाजपचा कोणताही मोठा नेता आला की रातोरात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.कोणतीही क्वालिटी टेस्ट न करता, डांबराचे तापमान न तपासता अंधारात कामे उरकली जात आहेत. हे थेट भ्रष्टाचाराचे लक्षण आहे."मा. अमित शाह यांना दाखवला जाणारा हा 'गुळगुळीत पुणे' नकली आहे. त्यांना पुण्याचा खरा विकास बघायचा असेल तर व्हीआयपी रस्ता सोडून 5 किलोमीटर बाजूला उपनगरात जाऊन पाहावे. तिथे पुणेकर रोज नरकयातना भोगत आहेत.घाईगडबडीत केलेल्या या निकृष्ट कामांचे तात्काळ "थर्ड पार्टी ऑडिट" व्हावे. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून हे रस्ते उखडून फेकून महापालिकेच्या दारात आंदोलन करू, असा इशारा कदम यांनी दिला.
पुणेकरांचा पैसा कुठे जातो ?
"पुणेकर वर्षभर कर भरतात तो खड्ड्यांतून गाडी चालवण्यासाठी का?" असा थेट प्रश्न महानगरपालिका आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांना कदम यांनी विचारला. काँग्रेसने केलेल्या या टीकेनंतर आता महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून काय उत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.