Property Registration Centers : प्रॉपर्टी खरेदी-विक्री साठी पुण्यात सुरू झाले राज्यातील पहिले हायटेक मॉडेल सब-रजिस्ट्रार ऑफिस - टॉप न्यूज मराठी

पुणे: महाराष्ट्रातील मालमत्ता खरेदी-विक्री आणि दस्त नोंदणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना एजंटच्या कटकटीपासून मुक्ती देण्यासाठी प्रशासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पुणे शहरातील बंड गार्डन रोड परिसरातील नोंदणी भवन आवारात राज्यातील पहिले अत्याधुनिक आणि हायटेक 'मॉडेल सब-रजिस्ट्रार ऑफिस' अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक कार्यालय आणि जागतिक कीर्तीची आऊटसोर्सिंग संस्था 'व्हीएफएस ग्लोबल' यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेले हे केंद्र देशातील अशा प्रकारचा एक पायलट प्रोजेक्ट आहे. या हायटेक कार्यालयामुळे मालमत्ता नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचा तासनतास वाया जाणारा वेळ वाचणार असून, संपूर्ण प्रक्रिया कॉर्पोरेट धर्तीवर अवघ्या काही मिनिटांत पार पाडणे शक्य होणार आहे. हे केंद्र नागरिकांसाठी एक ऐच्छिक पर्याय म्हणून खुले करण्यात आले असून, जुनी सरकारी दुय्यम निबंधक कार्यालये देखील नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.

या नवीन मॉडेल सब-रजिस्ट्रार कार्यालयामध्ये तंत्रज्ञानाचा अत्यंत कौशल्याने वापर करण्यात आला असून, तिथे अद्ययावत डिजिटल किओस्क मशीन, स्वयंचलित टोकन व्यवस्था, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष आणि अत्याधुनिक बायोमेट्रिक पडताळणी प्रणाली बसवण्यात आली आहे. या डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कार्यालयातील एजंट किंवा मध्यस्थांचा हस्तक्षेप पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. या कार्यालयात थेट प्रवेश मिळवण्यासाठी आणि अंतिम नोंदणीच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

स्लॉट बुकिंगसाठी नागरिकांना सर्वप्रथम 'IGR Maharashtra' या संकेतस्थळाला भेट देऊन होमपेजवरील 'e-Step-in' या सुविधेवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ओटीपी च्या साहाय्याने लॉग-इन करून जिल्हा 'पुणे' आणि कार्यालयांच्या यादीतून 'Model SRO' हा पर्याय निवडावा लागेल. उपलब्ध कॅलेंडरमधून आपल्या सोयीची तारीख आणि वेळेचा स्लॉट  निश्चित केल्यानंतर, दस्तऐवजाचा प्रकार आणि आधीच भरलेल्या मुद्रांक शुल्काचा(स्टॅम्प ड्यूटि) ई-चलन क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. ही सर्व माहिती भरून सबमिट करताच एक ऑनलाइन टोकन पावती जनरेट होते. या ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांना कोणत्याही लांबलचक रांगेत उभे न राहता, ठरवून दिलेल्या वेळेत अत्यंत जलद गतीने आणि सन्मानपूर्वक आपली मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. 

सरकारची ही योजना केवळ पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये आणखी चार मॉडेल सब-रजिस्ट्रार ऑफिस सुरू करण्याची योजना आहे. यानंतर ही व्यवस्था राज्यातील इतर भागांमध्येही टप्प्याटप्प्याने विस्तारली जाणार आहे.