मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दमदार खलनायक अभिनेते प्रदीप रावत Pradeep Rawat Passed Away यांचे आज वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. गेल्या 20 दिवसांपासून भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पोलिस अधिकारी असो, गावगुंडा असो किंवा सैन्याचा अधिकारी, प्रत्येक रोलमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. त्यांच्या ठाम आवाजामुळे आणि प्रभावी देहबोलीमुळे ते निगेटिव्ह रोलसाठी प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीत होते.
मात्र त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली ती 2008 मध्ये आलेल्या आमिर खानच्या ‘गजनी’ या सुपरहिट चित्रपटामुळे. या चित्रपटात त्यांनी ‘गजनी धर्मात्मा’ या मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या डोळ्यातील राग, संवाद फेकण्याची स्टाईल आणि पडद्यावरची उपस्थिती यामुळे ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. समीक्षकांनीही त्यांच्या या कामाचे भरभरून कौतुक केले होते. ‘गजनी’ नंतर त्यांनी साऊथच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्येही काम केले.
प्रदीप रावत यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक अनुभवी आणि कणखर अभिनेता गमावला आहे. पडद्यावर विलन म्हणून भीती वाटली तरी प्रत्यक्षात ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, असे त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी सांगितले. त्यांच्या अभिनयाचा ठसा हिंदी चित्रपटसृष्टीवर कायम राहणार आहे.