PMC NEWS : पुण्यातील शहर आणि ग्रामीण भागातील धोकादायक झाडे आणि फांद्यांची छाटणी करा - रामचंद्र कदम - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यातील अभिनव चौकाजवळ नुकतीच एक अत्यंत गंभीर व चिंताजनक घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक भलेमोठे झाड कोसळले. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तिला तातडीने झाडाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आल. आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली. त्यानंतर पुणे अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

ही घटना पुणे शहरासाठी गंभीर इशारा आहे. शहरासह समाविष्ट गावांमधील अनेक ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या व काही झाडे धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्यातील जोरदार वारे व मुसळधार पावसामुळे ती कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी पुणे शहरातून मार्गक्रमण करणार आहेत. अशा परिस्थितीत धोकादायक झाडे किंवा फांद्या कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत पुणे शहर व समाविष्ट गावांतील सर्व धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्यांचे तातडीने फेरसर्वेक्षण करण्यात यावे. ज्या ठिकाणी झाडे अथवा फांद्या धोकादायक अवस्थेत आहेत, त्यांची युद्धपातळीवर छाटणी किंवा आवश्यक ती कार्यवाही त्वरित करून नागरिक, वारकरी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयात कोणताही विलंब न करता विशेष मोहीम राबवून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेसचे मनपा गटनेते रामचंद्र कदम यांनी केली आहे.