पुणे : पुणे महापालिकाच्या वतीने यंदाच्या पालखी सोहळ्यानिमित्त ‘सेवावारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. “माझं शहर, माझी जबाबदारी” या संकल्पनेतून पुणे शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाचे दस्तऐवजीकरण करण्याचा उद्देश या माध्यमातून साधला जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असताना लाखो वारकरी शहरात दाखल होतात. या वारकऱ्यांची सेवा ही ईश्वरसेवेइतकीच पवित्र मानून या उपक्रमाला ‘सेवावारी’ असे नाव देण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत उद्या पुण्यातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पाचवी ते दहावीतील सुमारे ४ लाख ३६ हजार विद्यार्थी या स्पर्धेत एकाच वेळी सहभागी होणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या शाळांसह खासगी शाळांचाही यात समावेश आहे. पालखी परंपरा, वारीचे सांस्कृतिक महत्त्व आणि पुण्यनगरीची आध्यात्मिक ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचावी हा यामागील हेतू आहे.
तसेच सर्वांसाठी खुली फोटोग्राफी स्पर्धा आणि ० ते १६ वयोगटासाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.पालखी मार्गावर स्वच्छता, जनजागृती आणि सेवा कार्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याने विविध NGO, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची सांगता १० तारखेला रात्री ९ वाजता सामूहिक ‘पसायदान’ पठणाने होणार आहे. विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी पुणेकरांनी जिथे असतील तिथून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने व्यापक तयारी केली असून २,००० शौचालयांची व्यवस्था, ६ जर्मन हँगर शेड्स, १९५ मंडप पावसापासून बचावासाठी, १८० फिजिओथेरपिस्ट सेवेसाठी, ४०० मेडिकल किट्स, २० PMC ॲम्ब्युलन्स + २२ NGO ॲम्ब्युलन्स, ४० आरोग्य पथके, १०० वैद्यकीय विद्यार्थी सेवेसाठी, ४० वैद्यकीय कक्ष, पाण्याचे टँकर्स, फायर ब्रिगेड व आपत्कालीन पंप याशिवाय अश्व व इतर प्राण्यांसाठी पशुवैद्यकीय सेवा, डॉग स्क्वॉड, प्रकाशयोजना आणि जलनिकासीचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा वारकऱ्यांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज असून, पालखी सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत.