दिल्ली : नीट पेपरफुटीने दिल्ली आणि देशभरामध्ये आक्रमक स्वरूप धारण केले आहे. नीट परीक्षा पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे या आंदोलनाला अत्यंत नाजूक किनार देखील आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्र सरकारने अत्यंत तत्परतेने हाताळणे गरजेचे आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर अद्यापदेखील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये रोज नवीन विद्यार्थी, समर्थक, विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक संघटना एकत्र येत आहेत. दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशभरामध्ये या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, असा सूर एकवटला जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी यामध्ये लिहिले आहे की, देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही. प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्टट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. संबंधित विभागांना आवश्यक ती तातडीची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. परंतु, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सरकार कोणतीही भूमिका स्पष्ट करत नसल्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.