Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. वर्षभरातले 16 दिवस हे आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असतात. असे मानले जाते की या काळात आपले पितर पितृलोकातून पृथ्वीवर आपल्या कुटुंबाला भेटायला येतात. त्यामुळे या काळात केलेले श्राद्ध, तर्पण आणि दान यामुळे पितरांची आत्मा शांत होते आणि ते आपल्या कुटुंबाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात.
पंचांगानुसार यंदा 2025 मध्ये पितृ पक्ष रविवार 7 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि 21 सप्टेंबर रविवार सर्वपित्री अमावस्येला समाप्त होणार आहे. 7 सप्टेंबरला पौर्णिमेचे श्राद्ध असेल आणि 8 सप्टेंबरपासून प्रतिपदा श्राद्धाला सुरुवात होईल. यंदा पितृ पक्षाची सुरुवात चंद्रग्रहणावर आणि समाप्ती सूर्यग्रहणावर होत असल्याने हा पक्ष अतिशय विशेष मानला जात आहे.
या काळात रोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. दुपारच्या वेळी पितरांसाठी श्राद्ध केले जाते कारण दुपारची वेळ ही पितरांची मानली जाते. पितरांच्या फोटोसमोर तीळ, जव, कुश, पवित्र जल आणि फुलांनी तर्पण करावे. या काळात ब्राह्मणाला जेवण देणे, गरिबांना अन्नदान करणे, गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना अन्न देणे खूप शुभ मानले जाते. याला पंचबली म्हणतात. ज्या लोकांना आपल्या पितरांची मृत्यू तिथी माहित नाही त्यांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे.
पितृ पक्ष हा शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो. या 16 दिवसात नवीन घर घेणे, नवीन गाडी घेणे, लग्न, साखरपुडा, मुंडण किंवा कोणतेही मांगलिक कार्य करू नये. या काळात मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण खाणे टाळावे. घरात वाद विवाद करू नये आणि कोणाचेही मन दुखवू नये. केस कापणे आणि दाढी करणे देखील या काळात टाळले जाते. नवीन कपडे खरेदी करणे देखील शक्यतो टाळावे.
पितृ पक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. गीता पाठ करणे आणि गरुड पुराण ऐकणे यामुळे पितरांना शांती मिळते असे सांगितले जाते. या काळात केलेल्या दानाचे पुण्य अनेक पटीने मिळते त्यामुळे अन्न, वस्त्र आणि पैशाचे दान अवश्य करावे. श्रद्धेने केलेले कर्म हे पितरांपर्यंत नक्की पोहोचते असा विश्वास आहे.
डिस्क्लेमर - हा लेख पंचांग, धार्मिक मान्यता आणि सामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. यामध्ये दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धेवर आधारित असून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या घरातील जाणकार किंवा पुरोहितांचा सल्ला अवश्य घ्यावा.