पुणे : परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बस महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन करतात किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोषी आढळलेल्या 66 लक्झरी बसवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत परराज्यात नोंदणीकृत लक्झरी बसची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अग्निशामक यंत्र नसणे, जादा प्रवासी वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र संपलेले असणे, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (HSRP) नसणे, परवाना नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, मालाची वाहतूक करणे, अनुज्ञप्ती नसणे तसेच वाहनात अवैध बदल करणे आदी नियमभंग आढळून आले.
या कारवाईत 13 लाख 74 हजार 370 रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी 10 लाख 56 हजार 870 रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.
या विशेष तपासणी मोहिमेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व लक्झरी बसच्या चालक व मालकांनी वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, वैध परवाना व योग्यता प्रमाणपत्र बाळगावे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.