PCMC society watchman molestation : पिंपरी- चिंचवडमध्ये 4 चिमुकल्यांचा सोसायटीच्या वॉचमनचा विनयभंग - टॉप न्यूज मराठी

सध्या महाराष्ट्रातून दररोज चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 

सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच चार चिमुकल्यांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याची टाकी दाखवण्याचं आमिष देत हा विनयभंगाचा प्रकार करण्यात आला. 

मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारी सोसायटीत शांतता असताना घडली. आरोपी दिनेश चौधरी हा संबंधित सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाला. 

आणि पहिलाच दिवशी त्यानं हे दुष्कृत्य केलं. 6,8 आणि 10 वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेलं.

 तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली. 

आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी याची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यातील 10 वर्षांच्या एका मुलीनं हिंमत दाखवून घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. 

त्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतलं. आणि या नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या. याविषयीची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली.