Lifestyle : आजकाल जवळपास प्रत्येक घरातली हीच समस्या आहे. मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत. मोबाईलमध्ये कार्टून लावल्याशिवाय मुलं तोंडच उघडत नाहीत. सुरुवातीला ही गोष्ट सोपी वाटते. मुलं पटकन जेवतात म्हणून पालकही मोबाईल देतात. पण हळूहळू ही सवय मुलांच्या आरोग्यासाठी आणि मेंदूसाठी खूप घातक ठरते. मोबाईल बघत जेवणाऱ्या मुलांना काय जेवले हे कळतच नाही. त्यामुळे पचन बिघडते, लठ्ठपणा वाढतो आणि मुलं चिडचिडी होतात.
मोबाईलशिवाय जेवण्याची सवय का लागते
मुलांना लहानपणापासूनच मोबाईलची सवय पालकच लावतात. मुलं रडतात, त्रास देतात म्हणून पालक मोबाईल हातात देतात. नंतर मुलांना मोबाईलशिवाय जेवणच नको वाटते. मोबाईल बघताना मुलं जास्त जेवतात किंवा खूप कमी जेवतात. त्यांना भुकेची जाणीवच होत नाही. त्यामुळे ही सवय वेळीच मोडणे गरजेचे आहे.
ही सवय मोडण्यासाठी करा हे 5 सोपे उपाय
पहिला उपाय - जेवणाच्या वेळी घरात मोबाईल बंद ठेवा. मुलं मोबाईल मागत असतील तर आधी पालकांनी स्वतः मोबाईल बाजूला ठेवावा. जेवताना टीव्हीही बंद करावा. सगळ्यांनी एकत्र जमिनीवर बसून जेवावे. मुलांसोबत गप्पा मारत जेवावे. जेवणाच्या वेळी घरात शांत आणि आनंदी वातावरण ठेवावे.
दुसरा उपाय - मुलांना जेवणात सहभागी करून घ्या. मुलांना भाजी निवडायला सांगा, ताट वाढायला सांगा, पोळी लाटायला मदत करायला सांगा. जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने केलेले जेवण खातात तेव्हा त्यांना जेवणात रस वाटतो. त्यांना मोबाईलची आठवणच येत नाही.
तिसरा उपाय - मोबाईल एकदम बंद करू नका, हळूहळू कमी करा. जर मुलं तासभर मोबाईल बघत जेवत असतील तर आधी तो अर्धा तास करा. नंतर 15 मिनिटे करा. नंतर फक्त जेवणाच्या आधी 5 मिनिटे मोबाईल द्या आणि जेवताना मोबाईल बंद करा. एकदम बंद केल्यास मुलं जास्त रडतील आणि हट्ट करतील.
चौथा उपाय - जेवणाच्या वेळी मुलांना गोष्ट सांगा. आजी आजोबांची गोष्ट, लहानपणीची गोष्ट, प्राण्यांची गोष्ट सांगा. मुलांना गोष्टी ऐकताना जेवायला खूप आवडते. गोष्टीमुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढते आणि मोबाईलची गरज भासत नाही.
पाचवा उपाय - मुलं मोबाईलशिवाय जेवली तर त्यांचे कौतुक करा. शाब्बास, आज तू छान जेवला असे म्हणा. मुलांना छोटेसे बक्षीस द्या. पण मोबाईल हे बक्षीस म्हणून देऊ नका. मुलांना स्टिकर, चित्र काढण्याची पुस्तकं अशी बक्षिसे द्या.
पालकांनी लक्षात ठेवावे
मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत म्हणून त्यांना उपाशी ठेवू नका. मुलांना भूक लागली की ती स्वतःहून जेवतात. सुरुवातीचे 4 ते 5 दिवस त्रास होईल. मुलं रडतील, जेवणार नाहीत. पण पालकांनी हार मानू नका. थोडा संयम ठेवला तर मुलांना मोबाईलशिवाय जेवण्याची सवय लागते. मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि कुटुंबात एकत्र जेवण्याची सवयही लागते.