Parenting Tips : मुलं हट्ट करतात, रडतात, चिडतात, उलटं बोलतात, हे जवळपास प्रत्येक घरातलं चित्र आहे. दुकानात गेल्यावर खेळणं हवं म्हणून जमिनीवर लोळणं, मोबाईल दिला नाही म्हणून ओरडणं, अभ्यास करायचा नाही म्हणून भांडण करणं, असं अनेकदा होतं. अशावेळी पालकांनाही राग येतो. पण मुलांच्या रागावर रागाने उत्तर दिले तर मुलं अजूनच चिडतात. मुलांचा राग हा आजार नाही, ती एक भावना आहे. ती भावना कशी व्यक्त करायची, हे मुलांना शिकवणं ही पालकांची जबाबदारी आहे.
चाईल्ड थेरपिस्ट आणि पॅरेंटींग एक्सपर्ट सांगतात की, मुलांच्या रागाला घाबरून जाऊ नका. त्याला योग्य पद्धतीने हाताळले तर मुलं हळूहळू शांत आणि समजूतदार होतात. त्यासाठी या 3 गोष्टी नक्की करा.
1. मुलांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करू नका
आई वडील प्रेमापोटी मुलांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतात. पण हीच सगळ्यात मोठी चूक आहे. प्रत्येक वेळी हट्ट पूर्ण झाला की मुलांना असे वाटते की रडले, ओरडले की सगळं मिळतं. मग एखाद्या वेळी नकार दिला की ते अजून जास्त चिडतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच मुलांना गरज आणि हट्ट यातला फरक शिकवा. गरजेची गोष्ट असेल तर नक्की घेऊन द्या. पण फक्त हट्टासाठी मागितलेली गोष्ट असेल तर प्रेमाने पण ठामपणे नाही म्हणायला शिका. नाही म्हटल्यानंतर मुलं रडतील, पण 2 ते 3 वेळा हेच झाले की मुलांना कळते की रडून काही मिळत नाही. ही सवय मुलांना आयुष्यभर उपयोगी पडते.
2. मुलं रागात असताना तुम्ही रागात बोलू नका
मुलं रागात असताना पालकांनीही ओरडले तर घरात भांडणच होते. मुलं तुमचे शब्द लक्षात ठेवतात. तुम्ही रागात बोललेले वाक्य मुलांच्या मनावर कायमचे कोरले जाते. त्यामुळे मुलं चिडली असताना आधी तुम्ही शांत व्हा. मुलांशी खाली बसून, त्यांच्या डोळ्यात पाहून, प्रेमाने बोला. तुला राग आला आहे ना, मला समजतंय, असे म्हटले की मुलं अर्धी शांत होतात. मुलांना शांतपणे बोलायला शिकवा. तुम्हीच ओरडलात तर मुलंही तसेच शिकतील. तुम्ही शांत राहिलात तर मुलंही हळूहळू शांत राहायला शिकतील.
3. रागावलेल्या मुलांना एकटे सोडू नका
मुलं लहान असतील तर त्यांना रागात एकटे सोडू नका. त्यांना प्रेमाने मिठी मारा, हात हातात घ्या, डोक्यावरून हात फिरवा. स्पर्शाने मुलं लवकर शांत होतात. पण मुलं थोडी मोठी असतील, 8 ते 12 वर्षांची असतील तर त्यांना थोडा वेळ द्या. त्यांना शांत होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे द्या. त्यानंतर शांतपणे विचारा की काय झालं. लगेचच उपदेश देऊ नका. आधी मुलाचं म्हणणं ऐका. मुलांना वाटले पाहिजे की आई बाबा माझे ऐकून घेतात.
पालकांनी या गोष्टीही लक्षात ठेवाव्यात
मुलांसमोर कधीही एकमेकांशी भांडू नका. मुलांना सतत मोबाईल देऊन शांत करू नका. मुलं चांगले वागली की त्यांचे कौतुक करा. रोज मुलांबरोबर 15 ते 20 मिनिटे खेळा, गप्पा मारा. मुलांना त्यांच्या भावना बोलून दाखवायला शिकवा. मला राग आला आहे, मला वाईट वाटलं, असे बोलायला शिकवले तर मुलं ओरडून भावना व्यक्त करणार नाहीत.
लक्षात ठेवा, गुणी मुलं जन्माला येत नाहीत, ती घडवावी लागतात. मुलांच्या रागावर प्रेमाने आणि संयमाने उत्तर दिले तर मुलं नक्कीच शांत, समजूतदार आणि गुणी होतील.