Parbhani Crime : परभणीच्या पाथरीत 50 हजार रुपयांच्या वादातून 11 वर्षीय बालकाचे अपहरण, सिने स्टाईल थरार, नेमकं काय घडलं? - टॉप न्यूज मराठी

गुन्हे : परभणीच्या पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण रस्ता परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऊसतोडीसाठी घेतलेल्या 50 हजार रुपये आगाऊ रकमेच्या वादातून 11 वर्षीय बालकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 24 तासाच्या आत अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगव्हाण येथील एका महिलेने ऊसतोडीसाठी 50 हजार रुपये आगाऊ घेतले होते. मात्र त्या महिलेने कामावर न जाता आणि घेतलेली रक्कम परत न करता मोबाईल बंद केला होता. पैसे परत मिळत नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला होता.

महिला घरी न सापडल्याने चार जणांनी तिच्या 11 वर्षीय मुलाला कारमधून घेऊन गेल्याची तक्रार कुटुंबीयांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलिसांनी शोध मोहीम राबवत अवघ्या 24 तासात तीन आरोपींना अटक केली आणि बालकाची सुखरूप सुटका केली. सुटका केलेल्या बालकाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.

 प्रतिनिधी : विष्णू  सायगुंडे, परभणी