परभणी : जिल्ह्यात पतसंस्थेच्या आडून खाजगी सावकारीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने व्याजाचे पैसे वसूल केले जात असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
या वर्षी पाऊस न झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गंभीर दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही खाजगी सावकार, पतसंस्था, बचत गट आणि फायनान्स कंपन्या शेतकरी, शेतमजूर, महिला आणि इतर नागरिकांकडे तगादा लावत आहेत. अनेक नागरिकांनी घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही तुमचे पैसे अजून बाकी आहेत असे सांगून पुन्हा वसुली केली जात असल्याचा आरोप आहे.
पैसे न दिल्यास अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जाते. यापूर्वी विदर्भात एका खाजगी सावकाराने कर्जदाराच्या किडन्या विकून पैसे वसूल केल्याची घटना घडली होती. तर काही दिवसांपूर्वी नांदेड येथे एका कर्जदाराला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उचलून नेऊन दोन दिवस डांबून ठेवल्याची आणि नंतर त्याला फाशी दिल्याची घटना समोर आली होती.
या सर्व प्रकारामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. अनेक खाजगी सावकार, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्या या पुढाऱ्यांच्या जवळच्या मानल्या जात असून काही ठिकाणी भागीदारी असल्याचीही चर्चा आहे.
सध्या पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आणि शेतमजूर आधीच चिंतेत आहेत. त्यातच पतसंस्था, खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांनी वसुलीच्या नावाखाली धुमाकूळ घातला आहे. या जाचाला कंटाळून जिल्ह्यातील अनेक शेतकरी जीवनयात्रा संपवत आहेत.
शहरातही काही पतसंस्था नियम धाब्यावर बसवून कोणतीही कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया न करता फक्त चेक आणि बॉण्ड घेऊन कर्ज वाटप करत आहेत. व्याजासह पूर्ण पैसे वसूल करूनही वकील आणि न्यायालयामार्फत चेक बाऊन्स झाल्याच्या तक्रारी दाखल करून सामान्य नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. याकडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
प्रतिनिधी : विष्णू सायगुंडे, परभणी