परभणी : परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील बरबडी शेत शिवारात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेतकऱ्याने वर्षभर पोटच्या पोरासारखा जपलेला दोन एकर ऊस डोळ्यादेखत आगीत जळून खाक झाला आहे.
बरबडी येथील शेतात अचानक विद्युत तारांचा शॉर्टसर्किट झाला आणि ठिणगीने आगीने रौद्र रूप धारण केले. काही क्षणातच तोडणीसाठी आलेला दोन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सोबतच शेतात बसवलेले सोलर पॅनल देखील जळून गेले.
एकीकडे दुष्काळाने आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाण्याअभावी पिके जगवण्यासाठी धडपड सुरू असतानाच ही आग लागल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वर्षभराची मेहनत, कर्ज काढून केलेला खर्च सगळं काही या आगीत राख झाले आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तो पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आता उरल्या आहेत फक्त राख झालेल्या उसाच्या काळ्या काड्या. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून आणि गावकऱ्यांकडून केली जात आहे.
प्रतिनिधी: विष्णू सायगुंडे, परभणी