PARBHANI : दत्त संप्रदायाच्या जेष्ठ संत कालिदास महाराजांचा अपघाती मृत्यू; भाविकांमध्ये शोक - टॉप न्यूज मराठी

परभणी : पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्त संप्रदायाचे जेष्ठ संत कालिदास महाराज यांचा आज बीड बायपास येथे भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे श्री क्षेत्र गुंज येथे भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कालिदास महाराज आपल्या सहकाऱ्यांसह श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे गेले होते. यावेळी परतीच्या वाटेवर असताना बीड बायपास परिसरामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कालिदास महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भावजय स्मिता बोरीकर यांचा देखील मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये वाहन चालक देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. 

कोण आहेत कालिदास महाराज 

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र गुंज येथे दत्त संप्रदायाचे जेष्ठ संत कालिदास महाराज यांचे वास्तव्य होते. कालिदास महाराज यांनी चाळीस वर्ष मौनव्रताचं पालन केलं होतं. दत्त संप्रदायाच्या विचारांचा त्यांनी प्रसार केला. व्यसनमुक्ती, सदाचार आणि निस्वार्थ सेवा याचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून नेहमी दिला. 

कालिदास महाराज यांच्या अचानक झालेल्या अपघातातील दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.