परभणी - शहरातील गंगाखेड नाका येथील उड्डाणपुलावरील वाहतूक शुक्रवारी सायंकाळी पूर्णपणे ठप्प झाली. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून दोन तास वाहतूक ठप्प असल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. उड्डाणपुलापासून तीनही दिशांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी झाली. दुतर्फा वाहनांनी चौकात एकमेकांना क्रॉस करण्यासाठी स्पर्धा सुरू केल्याने कोंडी आणखी वाढली. जिंतूर रोड, बसस्थानक रोड आणि गंगाखेड रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर हजारो वाहने अडकून पडली. पावणे दोन तास वाहने एका ठिकाणाहून पुढे सरकली नाहीत.
रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि उड्डाणपुलावर गेल्या काही महिन्यांपासून बेशिस्त वाहतुकीमुळे दररोज कोंडी होत आहे. अलिकडे या कोंडीने कहर केला आहे. कोंडीचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेचे कर्मचारी कुठेही प्रयत्न करताना दिसले नाहीत, असा आरोप वाहनधारकांनी केला. यामुळे खासगी वाहने, बसेस, दुचाकींमधील हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.