Office properties : रिअल इस्टेट क्षेत्रात ऑफिस प्रॉपर्टीचा दबदबा; २०२६ च्या पहिल्या सहामाहीत १.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक: कॉलियर्स अहवाल - टॉप न्यूज मराठी

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात २०२६ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर कमर्शियल म्हणजेच ऑफिस मालमत्तांच्या खरेदीकडे राहिल्याचे समोर आले आहे. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी 'कॉलियर्स इंडिया'ने  प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, या कालावधीत देशातील एकूण संस्थात्मक रिअल इस्टेट गुंतवणुकीपैकी ४० टक्क्यांहून अधिक भांडवल एकट्या ऑफिस मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आले आहे.

अहवालानुसार, या सहा महिन्यांच्या काळात ऑफिस क्षेत्रात सुमारे १.९ अब्ज डॉलर (अंदाजे १६ हजार कोटी रुपये) एवढी मोठी गुंतवणूक झाली आहे.

या कालावधीत परदेशी गुंतवणुकीसोबतच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी  ऑफिस मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतात वाढते विस्तारकार्य आणि 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'कडून अ दर्जाच्या(ग्रेड ए) ऑफिस स्पेसला असलेली जोरदार मागणी या गुंतवणुकीमागील मुख्य कारण ठरली आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) मुळे ऑफिस मालमत्तांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि सुलभ झाली असून, यामुळे लहान व मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

ऑफिस मालमत्तांव्यतिरिक्त गुंतवणूकदारांनी रिटेल, औद्योगिक-लॉजिस्टिक्स  आणि डेटा सेंटर्स यांसारख्या विकसित होणाऱ्या क्षेत्रांनाही पसंती दर्शवली आहे. मात्र, गुंतवणुकीचा मोठा वाटा ऑफिस सेक्टरनेच काबीज केला आहे.

आशिया-पॅसिफिक (APAC) प्रदेशात भारतीय रिअल इस्टेट बाजाराने चमकदार कामगिरी केली असून, आगामी काळातही ऑफिस मालमत्तांमधील गुंतवणुकीचा हा वेग असाच कायम राहील, असा अंदाज कॉलियर्स इंडियाने व्यक्त केला आहे.