NPCI 'TAP-To-PAY Payment : NPCI च्या 'टॅप-टू-पे' मुळे डिजिटल पेमेंट होणार सोपे - टॉप न्यूज मराठी

नो इंटरनेट, नो टेन्शन! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसेल, तरीही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI द्वारे पेमेंट करणे शक्य होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) अशा एका भन्नाट सुविधेवर काम करत आहे, ज्यामध्ये ग्राहक आणि दुकानदार या दोघांकडेही इंटरनेट नसले, तरी व्यवहार पूर्ण होऊ शकेल. या सुविधेसाठी एनएफसी (निअर फील्ड कम्युनिकेशन) आधारित 'टॅप-टू-पे' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

'टॅप-टू-पे' हे पूर्णपणे एनएफसी आधारित तंत्रज्ञान आहे. यामध्ये ग्राहकाला आपला मोबाईल फक्त दुकानदाराच्या पॉईंट ऑफ सेल मशीनजवळ नेऊन 'टॅप' करावा लागेल. यानंतर दोन्ही डिवाइसेस एकमेकांशी संपर्क साधून पेमेंटची माहिती सुरक्षितपणे शेअर करतील. या पद्धतीमुळे पेमेंट करण्यासाठी कोणताही क्यूआर (QR) कोड स्कॅन करण्याची किंवा डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची गरज भासणार नाही.

'टॅप-टू-पे' कसे काम करणार? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम इंटरनेट सुरू असताना आपल्या UPI Lite वॉलेटमध्ये पैसे लोड करून ठेवावे लागतील. वॉलेटमध्ये पैसे असल्यास, इंटरनेट नसतानाही एनएफसी सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनद्वारे थेट PoS मशीनवर टॅप करून व्यवहार करता येईल. याद्वारे एका वेळी २,००० रुपयांपर्यंतचे ऑफलाईन पेमेंट करता येऊ शकते, ज्यासाठी कोणत्याही UPI पिनची (UPI PIN) आवश्यकता नसेल. इंटरनेट नसताना PoS मशीन या व्यवहाराची माहिती स्वतःकडे सुरक्षित साठवून ठेवेल. जशी मर्चेंट टर्मिनलला इंटरनेट कनेक्टिव्हिटी परत मिळेल, तशी ही माहिती पडताळणी आणि सेटलमेंटसाठी बँकेकडे पाठवली जाईल.

या नवीन सुविधेमुळे बेसमेंट, अंडरग्राउंड मेट्रो, विमाने किंवा दुर्गम डोंगराळ भागातील नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही डिजिटल व्यवहार करणे अत्यंत सोपे आणि वेगवान होणार आहे.