मुंबई : मलबार हिल परिसरातील महाराष्ट्र लोक भवन येथे कार्यरत कौस्तुभ सांगळे वय वर्ष 35 या जवानाच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. त्यांनी स्वतःच्याच सर्विस रायफलमधून गोळीबार करून घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा तपास मलबार हिल पोलीस करत होते. दरम्यान ही आत्महत्या प्रेम संबंधातून आलेल्या नैराश्यामुळे केली गेली असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे हे महाराष्ट्र लोक भवन संकुलामध्ये कर्तव्य बजावत होते. त्यांनी स्वतःच्या सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं.परंतु मलबार हिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तपास सुरू झाला. तपासा दरम्यान कौस्तुभ यांचे पोलीस दलातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासोबत प्रेम संबंध होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलशी निश्चित केले होते. या घटनेनंतर दोघांमध्ये तणावाचे वातावरण होते.
कौस्तुभ हे प्रचंड तणावाखाली होते. दरम्यान त्यांनी या महिलेसोबतचे खाजगी फोटो देखील तिच्या भावी पतीला पाठवले होते असे देखील समजत आहे. त्यांची मानसिक स्थिती सुदृढ नसल्याची माहिती यापूर्वी महिला कॉन्स्टेबल यांनी भाईंदर पोलिसांना दिली असल्याचा देखील समजते आहे. प्रेम संबंधांमध्ये आलेला दुरावा आणि कुटुंब देखील आधारासाठी सक्षम नसल्याने त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले गेले असल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचबरोबर पोलिसांना एक सुसाईड नोट देखील मिळाली असल्याच समजत आहे.
एकंदरीतच आज सकाळपासूनच या जवानाच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. दरम्यान कौस्तुभ सांगळे या जवानान प्रेम संबंधातून आलेल्या नैराशयामुळे आत्महत्या केल्याचं स्पष्ट झाल आहे.