New Delhi : "गोळीबाराचे आदेश कुणी दिले ?" जंतरमंतर प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक, अमित शाह यांच्या राजीनाम्याची केली मागणी - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनने झालेल्या गोळीबाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले आणि राजीनाम्याची मागणी केली. आज संसदेत अमित शाह या प्रकरणावर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यापूर्वीच राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राहुल गांधींनी नेमके काय म्हटले ?

राहुल गांधी म्हणाले, आम्हाला अमित शाह यांचे भाषण ऐकण्यात कोणतीही रुची नाही. ते केवळ लेक्चर देतात, पण प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. 

त्यांनी थेट तीन प्रश्न उपस्थित केले.

  • पहिला, जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले?
  • दुसरा, लाठीचार्ज करण्याची ऑर्डर कोणी दिली? 
  • तिसरा, दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालयाने या सूचना दिल्या आहेत का?

राहुल गांधी पुढे म्हणाले, जर हे आदेश गृहमंत्री अमित शाह यांनी दिले असतील तर ते थेट दोषी आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. आणि जर त्यांनी असे आदेश दिले नसतील, तरीही त्यांच्या अखत्यारीत ही घटना घडली आहे. त्यामुळे अकार्यक्षमतेसाठी त्यांनी पद सोडावे.

"फुग्यातून हवा निघाली आहे"

गेल्या 20 दिवसांपासून या विषयावर सरकार आणि गृहमंत्री गप्प होते असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, 20 दिवस ते संसदेत येऊन जात होते. मोठा ताफा असायचा पण तोंडातून एक शब्द निघाला नाही. आता शेवटच्या क्षणी बोलायला आले आहेत. फुग्यातून हवा निघून गेली आहे आणि आता त्यात पुन्हा गॅस भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यात धाडस नाही. काल आपण आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला त्यांच्या कल्पना ऐकायच्या नाहीत, असेही ते म्हणाले.

बोलत असताना काही पत्रकारांनी मध्येच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर राहुल गांधी यांनी माध्यमांनाही सुनावले. ते म्हणाले, आम्ही बोलत असताना तुम्ही मध्ये मध्ये प्रश्न विचारता. मग जेव्हा ते बोलतात तेव्हा का विचारत नाही? आमच्यासाठीच नियम वेगळे का? विद्यार्थी घाबरत नाहीयेत, तुम्हीही घाबरू नका. शेवटी ते म्हणाले, संपूर्ण मीडिया त्यांच्यासमोर उंदरासारखा का उभा राहतो? याचे उत्तर त्यांनीच द्यावे. जंतरमंतर प्रकरणाची सध्या देशभर चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज अमित शाह संसदेत काय खुलासा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधींच्या या थेट आरोपांनंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी आधीच केली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.