काठमांडू: भारत आणि नेपाळ दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिक आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, नेपाळ सरकारने भारतीय २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या वापराबद्दल एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता भारतीय आणि नेपाळी नागरिक नेपाळमध्ये या मूल्यांच्या नोटा कायदेशीररित्या सोबत आणू आणि घेऊन जाऊ शकणार आहेत. नेपाळची मध्यवर्ती बँक, 'नेपाळ राष्ट्र बँक' (NRB) ने याबाबतची अधिकृत सूचना पुन्हा जारी केली आहे. नव्या नियमांनुसार, आता कोणतीही व्यक्ती प्रति प्रवास कमाल २५,००0 रुपयांपर्यंतच्या २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा सोबत बाळगू शकते. ही परवानगी विद्यमान कायद्यांनुसार देण्यात आली आहे.
भारतात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या नोटाबंदीनंतर नेपाळ सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून १०० रुपयांपेक्षा मोठ्या सर्व भारतीय नोटांवर बंदी घातली होती. यामुळे नेपाळमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आणि तिथे राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, जवळपास एका दशकानंतर नेपाळ सरकारने ही बंदी शिथिल केली आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने स्पष्ट केले आहे की, ९ नोव्हेंबर २०१६ नंतर भारताने जारी केलेल्या २०० रुपयांच्या आणि नव्या डिझाइनच्या ५०० रुपयांच्या नोटांनाच ही मंजुरी देण्यात आली आहे. हा नियम यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी नेपाळच्या राजपत्रात (Gazette) प्रकाशित झाला होता, परंतु नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ही सूचना आता पुन्हा जारी केली आहे.
१०० रुपयांच्या किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या भारतीय नोटा कितीही प्रमाणात नेण्यास कोणतीही मर्यादा नाही. हे भारतीय चलन केवळ भारत आणि नेपाळ दरम्यान थेट प्रवासासाठीच वापरता येईल. दुबई किंवा सिंगापूरसारख्या कोणत्याही तिसऱ्या देशातून हे चलन नेपाळमध्ये आणता येणार नाही. परदेशी पर्यटक ५००० अमेरिकन डॉलर्सपर्यंतचे चलन विनाघोषणा आणू शकतात, मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास विमानतळ किंवा सीमेवर कस्टम अधिकाऱ्यांकडे नोंद करणे बंधनकारक आहे. रोख रकमेसोबतच भारत आणि नेपाळमध्ये आता QR/UPI पेमेंटची परस्पर सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. नेपाळ प्रवासासाठी भारतीय नागरिकांकडे केवळ पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (Voter ID) असणे आवश्यक आहे.
नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे भारत-नेपाळ सीमाभागातील छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, नेपाळमध्ये दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक जात असतात, त्यांना आता तिथे रोख पैशांची कमतरता भासणार नाही. भारतात काम करणारे नेपाळी मजूर आणि नागरिक आता आपली कमाई सहजपणे आपल्या कुटुंबाकडे नेपाळमध्ये घेऊन जाऊ शकतील.
या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार सुलभ होतील आणि पर्यटन क्षेत्राला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.