Mumbai Red Alert: मुंबई पावसाने तुडुंब! रस्ते जलमय, घरांमध्ये शिरलं पाणी; रेड अलर्टनंतर प्रशासन सतर्क - टॉप न्यूज मराठी

अतिमुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्याखाली; अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन

मुंबईत मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवार रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्ते, रेल्वे स्थानक परिसर आणि निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्टेशनबाहेरही गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली, तर काही ठिकाणी पावसाचं पाणी थेट घरांमध्ये शिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. चांदिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी भरलेल्या पाण्यात टायर ट्यूब टाकून महापालिकेच्या कामकाजाविरोधात आंदोलन केले. नालेसफाई आणि कंत्राटदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनीही विविध भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणा शहरातील विविध ठिकाणी तैनात असून पाणी उपसण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यातील अनेक भागांत 6 जुलैपर्यंत पावसाची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #mumbaimonsoon