पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे’वरील अपघातांपैकी निम्म्याहून अधिक अपघात बोरघाटात दहा किलोमीटरच्या अंतरात होत असल्याचे गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या घाटपट्ट्यात होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाणही लक्षणीय असल्याने संपूर्ण ‘एक्स्प्रेस वे’वर हा भाग सर्वाधिक धोकादायक ठरत आहे.
‘एक्स्प्रेस वे’वरील २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत अपघातांमध्ये बोरघाटात झालेल्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२३मध्ये एकूण १५४ अपघातांपैकी १०६ अपघात बोरघाटात झाले होते, तर ६५ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू याच पट्ट्यात नोंदले गेले. २०२४मध्ये अपघातांची संख्या १९१वर पोहोचली असून, त्यातील १०८ अपघात बोरघाटात झाले. या वर्षी ९० मृत्यूंपैकी ४२ मृत्यू घाटात झाले, तर १४३ गंभीर जखमींपैकी ५१ जण या भागात जखमी झाले. २०२५मध्ये अपघातांची संख्या १८७ होती, त्यापैकी ९१ अपघात घाटात झाले. ६८ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू आणि १४० गंभीर जखमींपैकी २४ जखमी बोरघाटातील अपघातांमध्ये होते.
सन २०२६मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे दिसून येते. या कालावधीत एकूण ३६ अपघातांपैकी ३५ अपघात बोरघाटातच झाले आहेत. या अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी नऊ मृत्यू घाटात झाले आहेत. १६ गंभीर जखमींपैकी १२ जखमी बोरघाटातील अपघातांमध्ये नोंदवले गेले आहेत.
बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात प्रामुख्याने अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे होत असल्याचे दिसले आहे. आता 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यानंतर तेथून केवळ छोटी प्रवासी वाहने सोडली आणि घाटातून अवजड वाहने सोडल्यास चित्र नक्कीच बदलेल. 'मिसिंग लिंक' कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करायला हवे. - तन्मय पेंडसे, वाहतूक अभ्यासक
अपघातांची प्रमुख कारणे...
-बोरघाटातील अपघातांमागे अनेक तांत्रिक आणि मानवी कारणांचा एकत्रित परिणाम दिसतो.
-घाटातील तीव्र वळणे आणि लांब उतार यामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड होते.
-विशेषतः उतारावर वेग वाढल्यास चालकांना अचानक ब्रेक लावणे कठीण जाते.
-वेगमर्यादेचे उल्लंघन हे अपघातांचे मोठे कारण ठरत आहे. जड वाहनांचे ब्रेक निकामी होणे ही एक समस्या.
-ट्रक आणि कंटेनरला दीर्घ उतारावर सतत ब्रेक वापरावा लागल्याने गरम होऊन निकामी होण्याचे प्रकार घडतात.
-धुके, पाऊस आणि कमी दृश्यमानता यांसारखे हवामानातील बदल अपघातांना कारणीभूत ठरतात.
-रस्ता ओला असल्यास घसरण्याचा धोका वाढतो.