मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे…एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाला…
आणि या मृत्यूमागे नेमकं कारण काय, याबाबत मोठं गूढ निर्माण झालं आहे.
याचं कारण म्हणजे बिर्याणी खाल्ल्यानंतर आणि रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर
काही तासांतच कुटुंबातील चौघांची प्रकृती बिघडली… आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
25 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 10.30 च्या सुमारास 40 वर्षीय पती 35 वर्षीय पत्नी आणि 16 वर्षीय तसेच 13 वर्षीय मुलींनी इतर पाच नातेवाईकांसोबत जेवण केले.
त्यावेळी एकूण 9 जण उपस्थित होते. जेवणानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. यानंतर कुटुंबातीलच 4 सदस्यांनी रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास कलिंगड खाल्ले.
काही तासांनंतर, पहाटे 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास चौघांची प्रकृती बिघडली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. इतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले.
पण, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसल्याने त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी 10.15 वाजता 13 वर्षीय धाकट्या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबाचे प्रमुख असलेल्या पतीचा रात्री सुमारे 10.30 वाजता मृत्यू झाला.
कुटुंबातील इतर दोन सदस्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे.
तसेच, डॉक्टरांनी आपले अंतिम मत राखून ठेवले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घरातून खाद्यपदार्थ आणि कलिंगडाचे नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत.
कलिंगड हे मृत्यूचे कारण होते की रात्रीच्या जेवणात काहीतरी गडबड होती, याचा तपास पोलीस आता करत आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.