Mumbai Local Murder Case: लोकलमधील हत्येप्रकरणी मोठी कारवाई; आरोपी रोशन सुवर्णा जीआरपीच्या ताब्यात - टॉप न्यूज मराठी

दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयंक लोहारची हत्या; फरार आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या

मुंबईच्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणाऱ्या मयंक लोहार हत्याप्रकरणात जीआरपीला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन सुवर्णा याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी बोरिवली जीआरपी ठाण्यात आणण्यात येत आहे.

मंगळवारी, 23 जूनच्या रात्री चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता. मुसळधार पावसामुळे लोकलच्या डब्यात पाणी येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. आरोप आहे की, संतापाच्या भरात रोशन सुवर्णा याने आपल्या बॅगमधून चाकू काढून 22 वर्षीय मयंक लोहार याच्या पोटात वार केला. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, बोरिवली जीआरपीने तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

मयंक लोहार हा विरार पूर्व येथील सुरम पार्क परिसरात कुटुंबासह राहत होता. तो अंधेरी येथील एका कपड्यांच्या शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मयंकच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण असून, धावत्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #mumbailocal