वांद्रे : मुंबईतील वांद्रे परिसरात एका भरधाव इनोव्हाने 8 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेतला आहे. रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असलेल्या अंश रविंद्र गुप्ता या तिसरीत शिकणाऱ्या मुलाला भरधाव इनोव्हा क्रिस्टाने धडक दिली, या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. उद्या त्याचा वाढदिवस असताना आज त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रविवारी दुपारी अंश घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. वांद्रे इथल्या सेंट अँड्र्यू चर्चजवळील बागेच्या परिसरातून तो महबूब स्टुडिओजवळील जॉन बॅप्टिस्ट रोडवर रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारने त्याला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कारचा वेग खूप जास्त होता. नागरिकांनी तातडीने त्याला त्याच कारमधून होली फॅमिली रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अंशचे वडील रस्त्यावर शेंगदाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
या अपघातानंतर सर्वात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघाताची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या संदीप सिंह याला आरोपीकडून विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप आहे. संदीप सिंह यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, अपघातावेळी मेघा रावल मोबाईलवर बोलत होत्या, त्यामुळे समोर अंश आला तरी त्या गाडीवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत. हा जबाब बदलण्यासाठी रावल कुटुंबीयांकडून त्यांना मोठी ऑफर देण्यात आली आणि दबाव टाकण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणी 44 वर्षीय मेघा रावल हिला अटक केली आहे. ती एक फिटनेस कोच असून तिचे कुटुंबिय बलाढ्य श्रीमंत असल्याचे सांगितले जाते. आता श्रीमंतीच्या जोरावर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. मेघा रावल हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षीदाराला फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता रावल कुटुंबियांवर पोलीस आणखी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.