Mumbai : मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री मोठा अपघात झाला. नरीमन पॉईंटवरून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना आदळल्या. या अपघातामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री 3 वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला दोन गाड्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे त्या मार्गावर काही गाड्या थांबल्या होत्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा एसयूव्हीने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की एसयूव्हीने अचानक पेट घेतला. यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
धडक देणाऱ्या एसयूव्हीचा चालक नशेत होता का, याची पोलीस चौकशी करत आहेत. भरधाव वेग हेच अपघाताचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.