MUMBAI : वरळीत तिरंग्याचा महासागर ! फडणवीसांच्या देशभक्तीपर गीताने पेटवला भाजपचा तिरंगा रॅलीचा जोश - टॉप न्यूज मराठी

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपाने मुंबईच्या वरळी येथे रविवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी हातात तिरंगा घेऊन "भारत माता की जय" च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.

रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी देशाच्या प्रगतीचा आणि तिरंग्याच्या अभिमानाचा उल्लेख केला. ते म्हणाले, "आज मला इथे तिरंग्याचा महासागर पाहायला मिळतोय. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी फासावर गळफास लावून घेतला, जवानांनी सीमेवर बलिदान दिले, तोच तिरंगा आज अभिमानाने फडकतोय. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत हा तिरंगा कधीच झुकणार नाही."

पुढे बोलताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. "मोदींच्या नेतृत्वात भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. चंद्रावर यान उतरवण्यापासून ते AI आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जो झेप घेतली आहे, ती अभूतपूर्व आहे. जगातील सर्वाधिक युवा असलेला देश आता कोणत्याही आव्हानाला घाबरणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाषणापूर्वी मंचावर ‘दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे देशभक्तीपर गीत लावण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हातात माईक घेऊन कार्यकर्त्यांसोबत गीत गायले. त्यांच्या या गायनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.