मुळशी : मुळशी परिसरात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पाण्याचा वाढता येवा नियंत्रणात ठेवण्यासाठी टाटा पॅावर प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा पॅावर, मुळशी धरण यांच्या माहितीनुसार:
1. आतापर्यंतचा विसर्ग: मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 5200 Cusecs पाणी सोडले जात होते.
2. वाढीव विसर्ग: पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी *आज दुपारी 1:00 वाजता विसर्ग वाढवून 8800 Cusecs करण्यात येणार आहे.
3. पुढील निर्णय: पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी बदल केला जाईल.
मुळशी धरण सध्या 86.40% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
प्रशासनाचे महत्वाचे आवाहन : टाटा पॅावरचे अधिकारी सुरेश कोंडूभैरी यांनी मुळा नदीकाठच्या सर्व नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:
1. नदीपात्रात जाऊ नका: लहान मुले, ज्येष्ठ आणि पर्यटकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात उतरू नये.
2. साहित्य आणि जनावरे हलवा: नदीकाठी असलेले शेती अवजारे, पंप, वाहने किंवा जनावरे असल्यास ती तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
3. सखल भागाला सतर्क करा: मुळा नदीच्या काठावरील आणि सखल भागातील नागरिकांना याबत तातडीने माहिती द्यावी. प्रशासनाच्या सूचनेनुसार वागावे.
4. दक्षता बाळगा: पुढील काही तास नदीची पातळी वाढू शकते. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
मुळशी धरणातून सोडलेले पाणी पुढे मुळा नदीतून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या दिशेने वाहते. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांनी आणि वसाहतींनी सतर्क राहावे. पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत विसर्ग असाच सुरू राहू शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.
माहिती स्रोत: सुरेश कोंडूभैरी, टाटा पॅावर, मुळशी धरण