MPSC विद्यार्थी आंदोलन अपडेट : पुण्यात MPSC आंदोलनावरून पोलिसांची कारवाई, 51 विद्यार्थ्यांसह 29 क्लासचालकांना नोटिसा? - टॉप न्यूज मराठी

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनाला परवानगी नसताना ते सुरू ठेवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी 51 विद्यार्थी आणि 29 क्लास व अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्ता अशा तीन ठिकाणी आंदोलन सुरू ठेवले आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस आंदोलनाच्या ठिकाणचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असून त्याच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आज सकाळी पुणे पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेल्या दोन LED स्क्रीन देखील काढून टाकल्या. रोहित पवार यांच्या भाषणासाठी आणि आंदोलनातील घडामोडी विद्यार्थ्यांना दिसाव्यात म्हणून या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या विनापरवानगी लावल्याने त्या काढण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनात MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात आहे. आज सकाळी रोहित पवार यांनी दावा केला की, भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवला आहे, मात्र तो राज्यपालांकडे पाठवणे गरजेचे होते. भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे जीवलग मित्र असल्याने सरकार त्यांना वाचवत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

दरम्यान पुण्यातील आंदोलनात आता तीन वेगवेगळे गट पडले आहेत. एस. एम. जोशी पुलावरील गट अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. शास्त्री रस्त्यावरील गट MPSC मुख्य परीक्षेत पुन्हा बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणावा, अशी मागणी करत आहे. तर टिळक चौक / अलका टॉकीज चौकातील गटाने 2025 पासून लागू झालेला वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच कायम ठेवावा, अशी भूमिका घेतली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती. त्यात MPSC सचिव महेंद्र हरपळकर यांची बदली, तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी, ऑफलाइन परीक्षा आणि रिक्त पदांची भरती करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे.

पोलिसांनी आणखी एका गोष्टीची चौकशी सुरू केली आहे. एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाच्या ठिकाणी एक संशयास्पद ड्रोन उडताना दिसल्याने त्याचा ऑपरेटर कोण आहे, याचा तपास सुरू आहे. विना परवानगी ड्रोन उडवला असेल तर त्यावरही कारवाई होणार आहे.

आज दुपारी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे देखील या आंदोलनाला भेट देणार आहेत. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.