महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. परीक्षेतील गुणांमध्ये प्रचंड तफावत आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर आयोगाने उमेदवारांना गुणपडताळणीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक उमेदवारांना दहा सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
एमपीएससीने 25 ऑगस्ट 2026 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या निकालात अनेक उमेदवारांना एका पेपरमध्ये 100 पेक्षा जास्त गुण मिळाले असताना दुसऱ्या पेपरमध्ये अवघे 2, 6, 11 आणि 14 असे अत्यंत कमी गुण मिळाले होते. एका उमेदवाराला भाषा, निबंध आणि सामान्य अध्ययनाच्या सर्व पेपरमध्ये चांगले गुण असताना वैकल्पिक विषयाच्या पेपरमध्ये फक्त दोन गुण देण्यात आले होते. त्यामुळे तपासणीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी लेखी तक्रारी आणि पुरावे आयोगाकडे सादर केले होते. या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून गुणपडताळणीची प्रक्रिया सुरु केली आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर लॉगीन करून शुल्क भरून अर्ज करावा लागणार आहे. पडताळणी नंतरची माहिती थेट त्यांच्या प्रोफाईल डॅशबोर्डवर कळवली जाणार आहे.
मात्र या निर्णयावर विद्यार्थ्यांमध्ये अजूनही नाराजी आहे. आयोगाने फक्त गुणांची बेरीज तपासणार की उत्तरपत्रिकेची प्रत्यक्ष फेरतपासणी करणार हे स्पष्ट केलेले नाही. केवळ बेरीज करून मूळ चूक दूर होणार नाही. ज्या तपासनिसांनी इतके कमी गुण दिले आहेत त्यांच्या तपासणीची पारदर्शक पद्धतीने फेरतपासणी व्हावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.