मुंबई - राज्यातील भरती परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत मोठी वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच सर्व भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वेळची एक वर्षाची सवलत देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अंतरिम अहवाल शासनास सादर केला आहे.
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर 2026 अन्वये ही उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्यातील विविध विभागांमधील विद्यार्थी आणि संबंधित हितधारकांशी सल्ला मसलत केली. त्यामध्ये प्राप्त झालेल्या मागण्या, सूचना आणि अभिप्रायांचा अभ्यास करून समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या आणि तातडीच्या मुद्द्यांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याने हा अंतरिम अहवाल सादर करण्यात आला आहे.
गट-क परीक्षेत पदसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या परीक्षेसाठी सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या या परीक्षेसाठी 5 हजारांहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागांकडून आणखी 11 हजारांहून अधिक पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. ही अतिरिक्त पदे शुद्धिपत्रकाद्वारे समाविष्ट करून एकूण पदसंख्या 16 हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे गट-क परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता निवडीची संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सर्व भरती परीक्षांसाठी वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत
उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून कमाल वयोमर्यादेत एक वेळची विशेष बाब म्हणून एक वर्षाची सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत दिनांक 1 जानेवारी 2026 नंतर प्रसिद्ध झालेल्या आणि निवड प्रक्रिया सुरू न झालेल्या सर्व जाहिरातींसाठी लागू राहील. तसेच दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठीही ही सवलत लागू राहील. त्यामुळे वयामुळे बाद होणाऱ्या हजारो उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार
गट-क परीक्षा 2026 परीक्षेसाठी अतिरिक्त पदांकरिता आणि वयोमर्यादा सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अर्ज प्रक्रिया एकदा पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी वयामुळे किंवा इतर कारणांमुळे अर्ज करू शकले नव्हते, त्यांना आता पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल. अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याची अधिकृत तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
परीक्षा पद्धतीत बदल नाही, प्रश्नपत्रिका नव्याने तयार होणार
गट-क पूर्व परीक्षेच्या विद्यमान परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल न करण्याची शिफारस समितीने केली आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांचे मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकरच जाहीर करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीची प्रश्नपत्रिका निर्मितीची कार्यवाही रद्द करून सुरक्षित प्रक्रियेद्वारे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
परीक्षेत पेपरफुटी रोखण्यासाठी कडक सुरक्षा
प्रश्नपत्रिका आणि ओएमआर उत्तरपत्रिकांची छपाई, साठवणूक आणि वाहतूक यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची शिफारसही समितीने केली आहे. त्यामुळे यापुढे परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.