MLA Satyajit Tambe : जेजुरीतील दुर्घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आरोग्य यंत्रणा उभारा ! - टॉप न्यूज मराठी

मुंबई : जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेने राज्यभर हळहळ व्यक्त होत असताना, अशा घटना टाळण्यासाठी आणि दुर्घटना घडल्यास वारकऱ्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी राज्यभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आपत्कालीन आरोग्य यंत्रणा उभारण्याची गरज आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना व्यक्त करत तांबे म्हणाले की, शिर्डी, पंढरपूर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर यांसह राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांकडे दरवर्षी लाखो वारकरी, भाविक, पालख्या आणि दिंड्या पायी तसेच वाहनांद्वारे प्रवास करतात. अशा वेळी अपघात अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ दुर्घटनेनंतर मदतकार्य करण्यापेक्षा, आधीच सक्षम आरोग्य सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे.

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्याचप्रमाणे शिर्डीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांचाही मोठा ओघ मुंबई-नाशिक महामार्गावरील सिन्नर-वावी मार्गाने असतो. त्यामुळे या परिसरात अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे तांबे यांनी म्हटले.

वावी येथील ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ही मांडला असून, मंजुरी मिळाल्यानंतरही काम अद्याप सुरू झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जेजुरीतील दुर्घटनेने अशा आरोग्य सुविधांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले असून, कुंभमेळ्यापूर्वी वावी ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाला गती देण्याबरोबरच आवश्यक असल्यास तात्पुरत्या ट्रॉमा सुविधा, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

"संकट आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा ते येण्यापूर्वीच यंत्रणा सज्ज असणे महत्त्वाचे आहे. वेळेत उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात," अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.