पुणे : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या म्हाडाच्या पुणे जिल्ह्यातील तब्बल ६०० ते ७०० सदनिका दोनदा लॉटरी काढूनही विक्रीविना पडून आहेत. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत असलेल्या या घरांना ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
एप्रिल महिन्यात म्हाडाने २९५ शिल्लक घरांसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर ऑनलाइन नोंदणी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ही विक्री प्रक्रिया ठप्प झाली. चार महिने उलटूनही या अडचणी न सुटल्यामुळे नागरिक परवडणाऱ्या घरांपासून वंचित आहेत.
गृहनिर्माण नियमांनुसार खासगी बिल्डरांनी म्हाडाला हस्तांतरित केलेल्या घरांची ठराविक वेळेत विक्री होणे गरजेचे असते. म्हाडाकडून निर्णय घेण्यास होणाऱ्या विलंबामुळे ही घरे पुन्हा मूळ बांधकाम व्यावसायिकांच्या ताब्यात जातील का, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
राहुल साकोरे, मुख्याधिकारी, म्हाडा, पुणे
"शिल्लक सदनिकांबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली आहे. या घरांच्या विक्रीसाठी पुढील प्रक्रिया व पर्यायांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल."