मुंबई आणि लगतच्या परिसरात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमांसाठी मोठी खूशखबर आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे १००० हून अधिक परवडणाऱ्या घरांची बहुप्रतिक्षित लॉटरी जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ठाणे, कल्याण आणि लगतच्या परिसरात अवघ्या २० ते २५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये घरे उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात नागरिकांना घराची भेट देण्यासाठी म्हाडा प्रशासन वेगाने काम करत आहे. दसऱ्याच्या आधी किंवा सणांच्या मुहूर्तावर या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, तर दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या काळात सोडत काढून विजेत्यांची नावे जाहीर केली जातील.
मुंबईत गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींच्या तुलनेत म्हाडा या लॉटरीमध्ये २० ते २५ लाख रुपयांच्या श्रेणीत परवडणारी घरे उपलब्ध करून देणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार आणि अंबरनाथ या वेगाने विकसित होणाऱ्या भागात ही घरे असणार आहेत. या सोडतीमधील बहुतांश घरे ही सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखीव असतील. खासगी बिल्डर्सकडून '२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने'अंतर्गत म्हाडाला प्राप्त झालेले फ्लॅट्स देखील या लॉटरीमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. ही लॉटरी पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीय प्रणालीद्वारे काढली जाणार आहे. इच्छुक अर्जदारांनी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.