MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा लॉटरीची मोठी अपडेट, पुढील आठवड्यात घोषणा! - टॉप न्यूज मराठी

MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या म्हाडा मुंबई मंडळाच्या सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. म्हाडाकडून या सोडतीचा अधिकृत कार्यक्रम आणि अंतिम तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी या संदर्भातील महत्त्वाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे घरासाठी अर्ज केलेल्या ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचा जीव आता भांड्यात पडला आहे.

म्हाडाने ३० मार्च २०२६ रोजी मुंबईतील२,६४० घरांसाठी सोडत जाहीर केली होती. सुरुवातीला १५ मे रोजी संगणकीय सोडत काढण्याचे नियोजन म्हाडा प्रशासनाचे होते. मात्र, सुरुवातीच्या काळात या योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर देशातील आणि राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अंतिम सोडतीची तारीख लांबणीवर पडली होती. आता आचारसंहिता संपल्यामुळे म्हाडाने पुढील आठवड्यात सोडतीचे वेळापत्रक निश्चित करण्याचे ठरवले आहे. 

या सोडतीसाठी म्हाडाकडे एकूण ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईतील गोरेगाव, ताडदेव, मानखुर्द, चेंबूर, वांद्रे आणि पवई यांसारख्या प्राईम लोकेशनवर ही हक्काची घरे उपलब्ध असणार आहेत. म्हाडाकडून अधिकृत तारीख घोषित झाल्यानंतर, पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर म्हाडाच्या अधिकृत प्रणालीद्वारे ऑनलाईन संगणकीय सोडत (Draw) काढली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून नागरिकांना सोडतीचे थेट प्रक्षेपण MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.