Melghat : मेळघाटच्या जंगलात थरार, एकाच वेळी पाच वाघ रस्त्यावर, मोबाईलमध्ये कैद झाले दुर्मिळ दृश्य - टॉप न्यूज मराठी

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून एक रोमांचक व्हिडिओ समोर आला आहे. ढाकणा-कोहा चेक पोस्टजवळील कोअर क्षेत्रात एकाच वेळी पाच वाघ रस्ता ओलांडताना दिसले. हा क्षण पाहून तेथून जाणाऱ्या शिक्षकांनाही काही वेळ काय करावे हेच सुचले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, काही शिक्षक या मार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना सुरुवातीला रस्त्याच्या कडेला एक वाघ उभा दिसला. त्यांनी गाडी थांबवून पाहिले तर पाठोपाठ एकामागोमाग एक आणखी चार वाघ जंगलातून बाहेर आले. पाचही वाघांनी अगदी शांतपणे रस्ता ओलांडला आणि दुसऱ्या बाजूच्या जंगलात गेले. या संपूर्ण दृश्याचे चित्रीकरण शिक्षकांनी मोबाईलमध्ये केले.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे. एकाच वेळी पाच वाघ दिसणे ही मेळघाटसाठी दुर्मिळ घटना मानली जाते. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मेळघाटातील वाघांची संख्या वाढत असल्याचे हे लक्षण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

मात्र वनविभागाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अजून आलेली नाही. वाघांची नेमकी संख्या किती वाढली आहे, हे अधिकृत व्याघ्र गणनेनंतरच स्पष्ट होईल. सध्या तरी हा व्हिडिओ मेळघाटच्या समृद्ध वन्यजीव संपदेची झलक दाखवणारा ठरत आहे.

पर्यटक आणि स्थानिकांनी जंगलातून प्रवास करताना काळजी घ्यावी, वाघ दिसल्यास गाडी थांबवून गर्दी करू नये आणि त्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये, असे आवाहन वन्यजीव प्रेमींकडून केले जात आहे.