अंतरवालीसराटी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 10 दिवसांपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी घेण्यास आणि वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळपासून जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांचे वैद्यकीय पथक अंतरवलीत ठाण मांडून बसले असून त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह करत आहे. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांचे वजन घटले असून त्यांना अशक्तपणा जाणवत आहे, अशी माहिती आंदोलक अशोक काळकुटे यांनी दिली आहे. वैद्यकीय पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे कळताच राज्यभरातून मराठा बांधव अंतरवलीकडे येऊ लागले आहेत. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज अंतरवलीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दानवे यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. जरांगे यांनी मांडलेल्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा मोठा विस्फोट होईल आणि त्याला सरकारच जबाबदार असेल, असे दानवे म्हणाले. हैदराबाद गॅझेटचे काय झाले, 55 लाख नोंदी सापडल्या असताना प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत, माझ्या आजोबांच्या नोंदीत कुणबी असेल तर मला पुन्हा पुरावे का द्यावे लागतात, असे सवालही त्यांनी सरकारला केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत अनेक उपोषणे केली आहेत. 29 ऑगस्ट 2023 रोजी पहिले आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुसरे उपोषण, त्यानंतर 2024 मध्ये मुंबईकडे कूच करताना त्यांनी मोठा मोर्चा काढला होता. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने मराठा समाजाला एकत्र आणले होते. प्रत्येक वेळी सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. पण हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करणे, सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपात येणाऱ्या अडचणींमुळे त्यांनी पुन्हा 10 दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले आहे.